पितळखोरा लेणि

पितळखोरा लेणि
पाटणा देवी मंदिरापासुन सुमारे ३ कि.मी. अंतरावतर पितळखोरे हे प्राचिन लेणे आहे. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पॆठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्‍याहुन जात होता. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली आसावी. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये शकरीन हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे होय. येथील लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोररेली आहे. लेण्याचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात १ ते ९ लेण्या आहेत व दुसर् भागात १० ते १२ लेण्या आहेत. दोन्ही गटातील लेण्या एकामेकासमोर आहेत. येथुन एक मार्ग औरंगाबादकडे जातो. इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फग्य्रुसन व बोर्जेस ह्यांनी ह्या लेण्या प्रथम लोकाभिमुख केल्या. येथील झालेल्या पुरातत्वीय संशोधनावरुन ह्या लेण्या पहिल्या शतकाच्या जवळपास वापरात असाव्या. नंतरच्या काही काळात ह्या लेण्या वापरात नसाव्या. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरु झाली हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते. लेण्यांच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्‍या आहेत.

उजव्या बाजूस ह्त्तीची रांग आहे. जणु काही लेण्यांच्या सर्व बोजा हेच पेलत आहे. असा भास त्यावरुन होतो. प्रवेशद्वार ५ फूट ४ इंच * ७ फुट ६ इंच आहे. दरवाज्याचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे.. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल हे अतिशय रुबाबदार पणे उभे आहेत. येथेच द्वारपालाचे वरचे बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या ह्त्तीचे वर किन्नराचे शिल्प आहे. दरवाजाचे वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. आज ते खाली पडले आहे. अशा रितीने गतकालाचा पुरावा देत ह्या लेण्या उभ्या आहेत.